Do not have an account?
Already have an account?

आधार जोडा

(आपला कर प्रवास सुलभ करा)

(आपला कर प्रवास सुलभ करा)

Frequently Asked Questions

आधार लिंक करण्यासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. आधार आणि पॅन लिंक करणे कोणाला आवश्यक आहे?

आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 139AA(2A) नुसार, 1 जुलै 2017 रोजी ज्या प्रत्येक व्यक्तीला पॅनचे वाटप करण्यात आले आहे आणि जी व्यक्ती आधार मिळविण्यास पात्र आहे, त्या व्यक्तीने आपला आधार क्रमांक विहित पद्धतीने सूचित करणे आवश्यक आहे.

सुरुवातीला, 30 जून 2023 पर्यंत आधारशी लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय होण्याची शक्यता होती.

लिंक करण्यास विलंब झाल्यास त्यासाठी ₹1,000 च्या विहित शुल्काचे पेमेंट करण्याच्या अधीन, ही अंतिम मुदत नंतर 31 मे 2024 पर्यंत वाढवण्यात आली.

पुढील सवलत (दिनांक 3 एप्रिल 2025 ची अधिसूचना क्र. 26/2025):

ज्या व्यक्तींना आधार नोंदणी आयडीच्या आधारे पॅन चे वाटप करण्यात आले होते, त्यांना एक विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. अशा व्यक्तींनी 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचा वास्तविक आधार क्रमांक वापरून पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास, 1 जानेवारी 2026 पासून पॅन निष्क्रिय होईल.

तथापि, अधिसूचित सवलत प्राप्त श्रेणींअंतर्गत समाविष्ट असलेल्या व्यक्तींवर पॅन निष्क्रिय होण्याच्या परिणामांचा प्रभाव पडणार नाही.

कृपया लक्षात घ्या:

सरकारने यापूर्वी व्यक्तींना वास्तविक आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीचा वापर करून पॅन मिळवण्याची परवानगी दिली होती. तथापि, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये 1 ऑक्टोबर 2024 पासून ही तरतूद बंद करण्याची घोषणा करण्यात आली. आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आता अशा सर्व पॅनधारकांना त्यांच्या नोंदी अपडेट करणे बंधनकारक करत आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया दिनांक 3 एप्रिल 2025 च्या अधिसूचना क्र. 26/2025 चा संदर्भ घ्या.

2. आधार-पॅन लिंक करणे कोणासाठी अनिवार्य नाही?

आधार-पॅन लिंक करण्याची आवश्यकता अशा वैयक्तिक व्यक्तीस लागू होत नाही जी:

  • आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि मेघालय या राज्यांमधील रहिवासी आहे;
  • आयकर अधिनियम, 1961 नुसार अनिवासी आहे;
  • मागील वर्षात कोणत्याही वेळी ऐंशी वर्षे वयाची किंवा त्याहून अधिक वयाची असेल; किंवा
  • भारताची नागरिक नाही.

 

   टीप:

  • या विषयावरील त्यानंतरच्या सरकारी अधिसूचनांनुसार प्रदान केलेल्या सवलती बदलांच्या अधीन आहेत
  • अधिक तपशिलांसाठी महसूल विभागाची दिनांक 11 मे 2017 ची अधिसूचना क्र. 37/2017 पहा
  • तथापि, वरीलपैकी कोणत्याही श्रेणीत येणार्‍या वापरकर्त्यांसाठी, पॅन सह आधार लिंक करण्याची स्वेच्छा असल्यास, ठराविक रकमेचे शुल्क भरणे आवश्यक आहे.

3. आधार आणि पॅन कसे लिंक करावे?

नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत अशा दोन्ही प्रकारचे वापरकर्ते लॉगिन न करताही, आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर त्यांचे आधार आणि पॅन लिंक करू शकतात. आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी तुम्ही ई-फाइलिंग होम पेजवरील ‘आधार लिंक करा’ या क्विक लिंकचा उपयोग करू शकता.

4. मी आधार आणि पॅन लिंक केले नाही तर काय होईल?

जर तुम्ही 30 जून 2023 पर्यंत तुमचे पॅन आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन निष्क्रिय होईल आणि पॅन निष्क्रिय झाल्यामुळे तुम्हाला खालील परिणामांना सामोरे जावे लागेल:

  1. अधिनियमातील तरतुदींनुसार देय कराच्या कोणत्याही रकमेचा किंवा त्यातील काही भागाचा परतावा त्याला/तिला दिला जाणार नाही;
  2. नियम 114AAA च्या उप-नियम (4) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या तारखेपासून सुरू होऊन ज्या तारखेला ते सक्रिय होते त्या तारखेपर्यंतच्या कालावधीसाठी त्याला/तिला अशा परताव्यावर व्याज देय होणार नाही;
  3. अशा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, जेथे प्रकरण XVJJ-B अंतर्गत कर कपात करण्यायोग्य असतो, तेव्हा कलम 206AA च्या तरतुदींनुसार अशा करामध्ये उच्च दराने कपात करण्यात येईल;
  4. अशा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, जेथे प्रकरण XVJJ-BB अंतर्गत स्त्रोतापासून कर वसूल करता येतो, असा कर कलम 206CC च्या तरतुदींनुसार उच्च दराने वसूल केला जाईल.

अधिक माहितीसाठी, कृपया 28 मार्च 2023 रोजीचे परिपत्रक क्र. 03/2023 आणि 3 एप्रिल 2025 रोजीची अधिसूचना क्र. 26/2025 चा संदर्भ घ्या.

5. माझ्या आधार आणि पॅन मधील नाव/फोन नंबर/जन्मतारीख यामध्ये विसंगती असल्यामुळे मी माझे आधार पॅनशी लिंक करू शकत नाही. मी काय करावे?

पॅन किंवा आधार डेटाबेसमध्ये आपले तपशील दुरुस्त करा जेणेकरून दोघांत जुळणारे तपशील असतील.

पॅनमध्ये तुमचे नाव अपडेट करण्यासाठी, कृपया प्रोटीयनशी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वर किंवा UTIITSL शी https://www.pan.utiitsl.com/ वर संपर्क साधा. 

आधार कार्डमधील तुमचे नाव अपडेट करण्यासाठी, कृपया  UIDAI शी https://uidai.gov.in/en/my-aadhaar/updateaadhaar.html वर संपर्क साधा. तुम्ही तुमच्या आधार क्रमांकासाठी डेटा काढण्याची विशेष विनंती करून UIDAI हेल्पडेस्कला ईमेलद्वारे (authsupport@uidai.net.in) वर मेल देखील पाठवू शकता.

तरीही लिंक करण्याची विनंती अयशस्वी ठरल्यास, तुम्हाला पॅन सेवा प्रदात्यांच्या (प्रोटियन व UTIITSL) समर्पित केंद्रांवर बायोमेट्रिक आधारित प्रमाणीकरणाचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमचे पॅन, आधार, शुल्क भरलेली (रु.1000/- ची) चलन प्रत सोबत बाळगावी आणि केंद्रावर आवश्यक बायोमेट्रिक प्रमाणीकरण शुल्क भरून या सुविधेचा लाभ घ्यावा. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी अधिकृत सेवा प्रदात्यांच्या तपशीलासाठी, प्रोटियन/UTIITSL च्या संबंधित वेबसाइट्सना भेट दिली जाऊ शकते.

6. माझे पॅन निष्क्रिय झाल्यास मी काय करावे?

निष्क्रिय पॅनचे हे परिणाम 1 जुलै 2023 पासून लागू होतील आणि पॅन पुन्हा सक्रिय होईपर्यंत सुरू राहतील. आधार क्रमांक सूचित करून पॅन सक्रिय करण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क लागू राहील.

अधिक माहितीसाठी, कृपया दिनांक 28 मार्च 2023 चे परिपत्रक क्र. 03/2023 व दिनांक 3 एप्रिल 2025 च्या अधिसूचना क्र. 26/2025 चा संदर्भ घ्या.

अस्वीकरण:

हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न केवळ माहिती आणि सामान्य मार्गदर्शनाच्या हेतूने दिले आहेत. करदात्यांना सल्ला दिला जातो की, त्यांनी त्यांच्या प्रकरणांना लागू होणारी अचूक माहिती, अर्थ आणि स्पष्टीकरणांसाठी संबंधित परिपत्रके, अधिसूचना, नियम आणि आयकर अधिनियमाच्या तरतुदींचा संदर्भ घ्यावा. या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या आधारे केलेल्या कृती आणि/किंवा निर्णयांसाठी विभाग जबाबदार राहणार नाही.

Detailed guides and documentation